मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. अशातच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी सोवण्यात आली आहे. त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच अनुषंगाने राज्यातील शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असणार आहेत. अनेक शाळांना शाळा चालविणे 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अशक्य असल्याने ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आलं आहे.
निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे. तसेच अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र सुद्धा देण्यात आले. या सगळ्याचा विचार करून 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवस ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय?
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक18,19 व 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती, असे आदेश राज्य सरकारचे उपसचिव तुषार महाजन यांच्या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.