मुंबई: पुरोगामी विचारांच्या लेखिका व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील तसेच नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याला शिवसेना शिंदे पक्षात देण्यात आलेला पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला आहे. तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या पांगारकरला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत प्रवेश दिल्याने विविध स्तरातून टीका करण्यात आली. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देत प्रवेशाला स्थगिती दिली आहे.
पांगारकर हा २००१ ते २००६ या काळात जालना परिषदेत शिवसेनेचा नगरसेवक होता. पुढे शिवसेनेत मतभेद झाल्याने तो हिंदू जनजागृती समितीत काम करू लागला. लंकेश हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून ऑगस्ट २०१८ रोजी त्याला अटक करण्यात आली होते. नालासोपारा शस्त्रसाठा व स्फोटक प्रकरणातही तो आरोपी आहे.
पांगारकर याला गौरी लंकेश हत्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात कर्नाटक कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत त्याने शिवसेनेत प्रवेश केला. लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याच्या संपर्कात पांगारकर होता. गौरी लंकेश यांच्या हत्येवेळीही दोघांमध्ये संपर्क असल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले होते. मागील महिन्यात कर्नाटक हायकोर्टाने पांगारकरला जामीन मंजूर केला. तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षात त्याला प्रवेश देण्यात आला.