मुंबई : राज्यात विश्नासभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सगळेच राजकीय पक्ष मोठं मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. अशातच आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे सुद्धा पवार म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले शरद पवार..
शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे. मात्र, सध्या तो सकंटात आहे. या भाजपच्या सरकानं शेतकऱ्यांच्या दु:खाकडे बघितलं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. आज मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. या सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून ‘या’ घोषणा..
यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासोबतच जातनिहाय जनगणना करणार असून 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांच्या कडून करण्यात आली आहे.