मुंबई : नुकताच मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये दोन मेळावे झालेले दिसून आले. एक उद्धव ठाकरेंचा तर दुसरा एकनाथ शिंदेंचा. वर्धापन दिन सोहळ्यात शिंदे गटाने अजित पवारांवर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले आहे.
शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. या वर्धापन दिनाचे दोन मेळावे झाले असून, एक उद्धव ठाकरेंचा तर दुसरा एकनाथ शिंदें यांचा. वरळीतल्या डोम सभागृहात एकनाथ शिंदेंनी मेळावा घेतला होता. तर षण्मुखानंद हॉल या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदें आणि भाजपावर जोरदार टीका केली. तर एकनाथ शिंदें त्यांच्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
काय बोलले उद्धव ठाकरें?
सरकार पाडायचं, पक्ष फोडायचे, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा खरा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय, जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही. अशी कडाडून टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर केली.
एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर
“आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिल आहे. आपण घेतलेला निर्णय बरोबर होता हे निवडणुकीतून दिसून आल आहे. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली”, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं.
नेमकं काय म्हणाले रामदास कदम?
अजित पवारांनी जेव्हा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या काही आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं. असं रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.