मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडण्याचे कारण म्हणजे अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढं आणले आणि नंतर त्यांच्या वरिष्ठांना वाटलं की, पुतण्याऐवजी आपल्या मुलीकडे पक्ष जायला हवा. हीच गोष्ट शिवसेनेमध्ये देखील झाली. उद्धव ठाकरेंना वाटलं राजकारणात आदित्य ठाकरे यांना पुढेआणलं पाहीजे. त्यानुसारच त्यांनी राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी त्यांनी पक्षाची मूळ विचारधारा बाजूला सारून दुसऱ्या विचारधारेला जवळ केलं. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. “काँग्रेस न होती तो क्या होता”, या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर आपली भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. या सर्व पक्षांनी काँग्रेसच्या राजकारणाची शैली अंगीकृत केली. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर देशात राजकारण करण्याची परंपरा सुरु केली. परंतु, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसच्या विचारधारेला आणि पद्धतीला नाकारत आपली स्वतंत्र शैली विकसित केली. आज परिस्थितीनुसार इतर राजकीय पक्षांनी हळूहळू स्वतःमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या पावलांवर पाऊल टाकत बाकीचे राजकीय पक्ष स्वतःमध्ये बदल करताना दिसत आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.