मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका सुरु करणार आहेत. फडणवीस राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला असून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलं आहे. राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत.