मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षात घेता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई शहराशी थेट बोगद्यानं जोडण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांनी आज दिले. या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेचा सखोल अभ्यास करून विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी एनएमआरडीएस (Navi Mumbai Metro Region Development Society) यांना दिले आहेत.

आज एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कार्यालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसोबत प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाढत्या वाहतुकीसाठी हाय-टेक दुवा आवश्यक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील प्रमुख पायाभूत प्रकल्पांपैकी एक असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वर्षाला दोन कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळण्याची क्षमता असलेल्या या विमानतळामुळे भविष्यात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर प्रवासी व वाहनांची ये-जा अपेक्षित आहे.

सध्याचे उपलब्ध मार्ग, महामार्ग, मेट्रो व रेल्वे हे आगामी वाहतूक वाढीला पूरक ठरणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईतील बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत बोगद्या मार्गाने जोडणी शक्य आहे का, याचा अभ्यास करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.
तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यासाचे निर्देश
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भू-वाहतूक तसेच सागरी वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकेल का, यावर सविस्तर अभ्यास करण्यास सांगितले आहे. प्रकल्पाचे आराखडण, पर्यावरणीय परीणाम, भौगोलिक अडचणी याचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या मदतीने व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी होऊन दोन्ही शहरांना जलद आणि सुलभ जोडणी मिळू शकते. त्यामुळे याकडे केवळ वाहतूक सुलभीकरण नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे.







