शिरूर: शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसांच्या अंतराने दोन विवाहित महिला त्यांच्या अल्पवयीन मुलांसह बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी फूस लावून अथवा अन्य प्रकारे महिलांसह मुलांना घेऊन अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून,शिरूर पोलीस ठाण्यात अपहरणाचे स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत रामलिंग येथील फिजा युनुस दरोगे (वय 23) ही महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह बेपत्ता असून,फिजा दरोगे या 8 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही मुलांना सोबत घेऊन ब्लाउज शिवण्यासाठी रामलिंग येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या.मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांच्यासोबत आफाज युनुस दरोगे (वय 5) आणि आदिल युनुस दरोगे (वय 3) ही दोन्ही मुलेही बेपत्ता आहेत.

याप्रकरणी महिलेचा पती युनुस जब्बार दरोगे(वय 28,व्यवसाय मजुरी,रा.रामलिंग,ता.शिरूर, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिजा यांनी हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता.आफाज याच्या अंगात लाल शर्ट व काळी हाफ पॅन्ट,तर आदिल याच्या अंगात पिवळा शर्ट व राखाडी हाफ पॅन्ट असल्याचे पोलिसांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

दुसऱ्या घटनेत रामलिंग, देवाडेवस्ती येथील अनिता सागर धुळे (वय 29) ही महिला आपल्या चार वर्षीय मुलगा भिमा सागर धुळे याच्यासह 6 सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्या आहेत. अनिता यांनी मुलाला सोबत घेऊन शिरूर येथील सरकारी दवाखान्यात जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्या व त्यांचा मुलगा घरी परत न आल्याने पती सागर मुरलीधर धुळे (वय 39) यांनी शिरूर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणीही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता यांनी पिवळ्या रंगाची साडी व लाल ब्लाउज परिधान केला असून, त्यांच्या गळ्यात मणी मंगळसूत्र व देवाचा ताईत असल्याचे वर्णन महिलेच्या पतीने फिर्यादीमध्ये दिले आहे. तसेच मुलगा भिमा याने जांभळ्या रंगाचा फुल शर्ट व जांभळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती.असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत असून,बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी तपास पथकांकडून विविध दिशांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.अज्ञात व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान,या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.







