लोणी काळभोर : नागरिकांची फसवणुक (Hadapsar Fraud Scheme) करण्यासाठी नवनवीन प्रकार, युक्त्या आखल्या जातात. नागरिकांना हेरून (Pune News) ठग सर्वात प्रथम त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर एकापाठोपाठ फसवणुकीचे पत्ते उघडण्यास सुरवात होते आणि हजारो कोटींची माया बेकायदा गोळा करतात. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. परंतु हे ठग आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गाशा गुंडाळून परदेशात पळून गेल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र या घोटाळ्यात बळीचा बकरा कसा होतो एजंट? आज आपण पुणे प्राईम न्यूजच्या विशेष लेखात हे ठग नागरिकांना कसा गंडा घालतात? याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

कुठलीही संस्था अथवा ठग नागरिकांना सर्वात प्रथम अल्पवधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवितात. त्यांनतर काही गुंतवणूकदारांना याचा फायदा होतो. त्यानंतर त्यांची माऊथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणात होते. याचाच फायदा घेऊन संस्था एजंट लोकांना कमिशनचे लालच देऊन नियुक्या करते. जो पर्यंत संस्थेमध्ये गुंतवणूक जास्त असते तो पर्यंत नागरिकांना परतावा दिला जातो.

कुठल्याही संस्थेचा भांडाफोड झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून परतावा अथवा मुद्दल मागण्याचा वेग वाढतो. अशावेळी संबंधित संस्थेला ही रक्कम देणे शक्य होत नाही. यापाठीमागे असे कारण आहे की, जेव्हा गुंतवणुकीचा वेग कमी होऊन परताव्याचा मागणी वाढली जाते. त्यावेळेस अशा बोगस कंपन्यांचा भांडाफोड होतो. हा इतिहास आहे. असे भामटे पहिल्यांदा एका फर्मच्या नावे रक्कम गोळा करतात. त्यानंतर ती रक्कम परदेशातील खात्यांमध्ये वर्ग करतात आणि जनतेकडून दुसऱ्या फर्मच्या नावाने गुंतवणूक घेतली जाते. पण ही गुंतवणूक एका लिमिटनंतर परदेशात वळवली जाते.

यादरम्यान गुंतवणूकदार संबंधित संस्थेच्या संचालक अथवा एजंट लोकांशी संपर्क करून किमान मुद्दल मागण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, ते गुंतवणूकदारांना तुमची मुद्दल देण्यासाठी कंपनी पॉलिसीनुसार दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे असे भासवितात. मात्र दोन महिने झाल्यानंतर जेव्हा गुंतवणूकदार परत मुद्दलच्या संदर्भात चौकशी करतात तेव्हा ते पुन्हा त्यांना पुढची तारीख देतात. हा गुंतवणूकदारांसोबत अशा प्रकारचा खेळ खेळला जातो. या दरम्यान संबंधित कंपनीचे संचालक ठरल्याप्रमाणे गाशा गुंडाळून परदेशात पसार होतात.
एजंट लोकांनो तुरुंगाची हवा खाण्याआधी तुम्हीपण सावध व्हा..
गुंतवणूकदार संबंधित संस्थेच्या एजंट लोकांच्या घरी जातात. परंतु, या संस्थेच्या भूलभुलैय्यामध्ये एजंटही फसलेला असतो. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार पोलीस ठाण्यात धाव घेतात आणि संबंधित कंपनीचे संचालक आणि एजंट यांच्या विरोधात तक्रार दिली जाते. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. परंतु संचालक हे आधीच देश सोडून पळालेले असतात. त्यामुळे या घोटाळ्यात एजंट हा बळीचा बकरा ठरतो आणि पोलिसांचा ससेमिरा एजंटच्या मागे लागतो. गुंतवणूकदरांचा दबाव व पोलिसांच्या ससेमिराला कंटाळून श्रीगोंदा येथील इन्फिनिटी बिकनच्या प्रकरणात एका एजंटने आत्महत्या सुद्धा केली आहे. त्यामुळे एजंट लोकांनो तुरुंगाची हवा खाण्याआधी तुम्हीपण सावध व्हा.
ठग पळून जाण्याआधीच आपली गुंतवणूक काढून घ्या
हडपसर (पुणे) येथील ठगांनी प्रतिमाह 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून 4 हजार कोटींहून अधिक रुपयांची माया बेकायदा गोळा केली आहे. मात्र हे ठग मागील दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा देत नसून पुढची तारीख देत असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. तसेच त्यांनी दुसऱ्या फर्मच्या नावे पैसे वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा ही फ्रॉड लवकरच समोर येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनो आपली गुंतवणूक लवकर काढून घ्या. अन्यथा ठग गाशा गुंडाळून पळून गेल्यावर तुमच्यावर देखील ही वेळ येईल?







