पुणे: पुण्यातील वानवडी परिसरातून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या सोसायटीच्या गेटजवळ उभे असलेल्या एका नागरिकाकडील तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. भरवस्तीत आणि सकाळच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी, 8 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित नागरिक काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड होती. ही रक्कम घेऊन ते आपल्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे.

नागरिक सोसायटीच्या मुख्य गेटजवळ पोहोचताच दुचाकीवरील दोन्ही आरोपींनी संधी साधली. काही क्षणांतच मागे बसलेल्या व्यक्तीने नागरिकाच्या हातातील रोकड असलेली पिशवी जोरात ओढून घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तक्रारदाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही. पिशवी हातात पडताच दुचाकी चालवणाऱ्या आरोपीने वाहन वेगाने पुढे नेले आणि दोघांनीही घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली असून अधिक तपास केला जात आहे.







