Fire in Mumbai School: मुंबई : मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने शाळा सध्या बंद असल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये ही आग लागली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. दोन तासाच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सध्या तिथे कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलची इमारत ही धोकादायक इमारत असल्याने येथे तीन वर्षांपासून तिथे शाळा भरत नव्हती. कोव्हिड काळात या शाळेच्या इमारतीचा वापर लसीकरण केंद्रासाठी करण्यात आला होता.
आज दुपारी १ च्या सुमारास ६ ते ७ ऑक्सिजन सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळीतच शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली अशी माहिती देण्यात आली आहे. शाळेच्या पाच मजली इमारतीला लागून असलेल्या एका हॉलमध्ये आग पसरली. हॉलच्या आत गाद्या होत्या, ज्यामुळे आग आणखी पसरली होती. स्फोट झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरली होती.