मुंबई : समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत महामार्गाच्या कामातून अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सर्वसामान्यांची? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यांबाबतचे पुरावेही सांगितले आहेत. आज रोहित पवार मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
काय आहे रोहित पवार यांचे आरोप?
अधिकारी राधेशाम मोपालवार यांचे नाव घेत समृद्धी महामार्गात ३००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. समृद्धी महामार्ग कशाप्रकारे भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता, कोणी किती जमीनी कशा विकत घेतल्या या खोलात मी जाणार नाही. फक्त या अधिकाऱ्यांच्या संबंधित एक छोटे उदाहरण सांगतो.
२०१८ मध्ये समृद्धी महामार्गाचं टेंडर काढण्यात आले होते. २०१८ मध्ये या टेंडरची किंमत ४९ हजार कोटी इतकी होती. त्यानंतर ४ महिन्यांतच नवीन टेंडर काढण्यात आलं. तेव्हा या टेंडरची एकूण किंमत ५५ हजार कोटी रुपये इतकी करण्यात आली. म्हणजेच ४ महिन्यात टेंडरची एकूण किंमत ६०८८ कोटी रुपयांनी वाढली. त्यामुळे ‘समृद्धी’ सामान्यांची झाली की अधिकारी, नेत्यांची झाली? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्या स्वत:च्या नावावर १५०० कोटी रुपये इतकी मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर १५० कोटी तर तिसऱ्या बायकोच्या नावावर २०० कोटींची मालमत्ता आहे. इतकंच नाही, तर अधिकारी मोपलवार यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींच्या नावांवर जवळपास ८५० कोटी इतकी मालमत्ता आहे. त्यांचे भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावरही ५० कोटींची मालमत्ता आहे. अशा पद्धतीने हा आकडा एकत्रित केला तर तो ३००० कोटींच्या आसपास जातो, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.