मुंबई: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मैदानात उतरले आहेत. शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 6 जानेवारीपासून राज्याचा दौरा करणार आहेत. मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त 60 दिवसच उरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
“आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळ पाऊल उचलून, महायुतीचं सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट 45 प्लस आहे, ते गाठण्यात काही अडचण वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक गुरुवारी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त या बैठकीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या 6 जानेवारीपासून होणार आहे. यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक येथे 6 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होईल.
असा असेल एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा
६ जानेवारी- यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा
८ जानेवारी- अमरावती आणि बुलढाणा
१० जानेवारी- हिंगोली आणि धाराशीव
११ जानेवारी- परभणी आणि संभाजीनगर
२१ जानेवारी- शिरूर आणि माव़ळ
२४ जानेवारी- रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
२५ जानेवारी- शिर्डी आणि नाशिक
२९ जानेवारी- कोल्हापूर
३० जानेवारी – हातकंणगले