मुंबई : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या आज भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात राज्यसभेच्या एकूण ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती.
मात्र, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीसमोर संकट उभं राहिलं आहे. अशा परिस्थितीत मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्याकडून एक मास्टरस्ट्रोक खेळण्यात आला आहे. शरद पवार यांनी राज्यसभेसाठी मविआकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला असून शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
म्हणून छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असं शरद पवार याचं म्हणणं आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
.