मुंबई : मुंबईच्या उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती सामोर येत आहे.
दरम्यान, ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. महेश गायकवाड यांच्यावर झाडलेल्या सहा गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका ५० गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.