मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण होणार असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेची नजर उद्धव ठाकरें यांच्या खासदारांवर असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक माहिती अशी की, उद्या (24 जानेवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही खासदरांसोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. अशी शक्यता आहे की अमित शहा ठाकरेंच्या खसदारांशी चर्चा करतील. या दरम्यान ठाकरेंचे काही खासदर शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
याचबरोबर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा आज मेळावा होणार आहे. मात्र शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी आज मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकित केलं होतं. ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षप्रवेशांवर तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे शिंदे गटाने सध्यातरी बघ्याची भूमिका घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
2/3 म्हणजेच 6 खासदार शिंदे सेनेत विलीन करावे लागतील; विधीमंडळ माजी सचिव अनंत कळसे
या बाबत मोठी अपडेट अशी की, विधीमंडळ माजी सचिव अनंत कळसे तांत्रिक बाबींवर बोलताना म्हणाले, ” 10 व्या सूची अंतर्गत आपण महाराष्ट्रात पक्षांतर बंदी कायदा केला आहे. 1985 च्या आधी 1/3 सदस्य फुटण्याची तरतूद होती, मात्र आता 2/3 अशी केली आहे. 2/3 सदस्य विलिनी करावे लागतील. एक पर्याय म्हणजे आपला एक वेगळा गट स्थापन करून ते शिंदे गटात विलीन होऊ शकतात. मात्र ते 6 खासदार असतील तरच हे विलीनीकरण शक्य आहे.
पक्षांतर विरोधी कायद्यानुसार वेगळा गट स्थापन करत किंवा 2/3 म्हणजेच 6 खासदार शिंदे सेनेत विलीन करावे लागतील. अन्यथा हे विलीनीकरण टिकणार नाही” यामध्ये सहा खासदारांहून कमी सदस्य फुटले आणि त्यांना शिंदे सेनेत सामील केलं तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल आणि खासदारकी रद्द होईल. शा सदस्यांपेक्षा अधिक असतील तरच विलीनीकरण शक्य आहे. अन्यथा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल.
मुंबईत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज पुन्हा एकदा दोनही शिवसेनेचे दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीत महामेळाव्याचं आयोजन केलं आहे त्यात. येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मुंबईतल्या बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे.