मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मोठं दिलास दिला आहे. सचिन वाझे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वाझे मागील 2 वर्षांपासून तुरुंगात होते. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन वाझे हे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
पोलिस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत.
दरम्यान, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. आता उच्च न्यायालयाने सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे.
मुंबई हायकोर्टाने आरोपी सचिन वाझेला अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जामीनाच्या अटी-शर्थी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अनिल देशमुख यांच्यासह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारीही सचिन वाझे याने दर्शवली होती. मात्र, ईडीने याला विरोध केला होता. आता मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे.