मुंबई: माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केलेल्या रुपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९) आणि शिवम कोहाड (२०) यांना सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम देण्यात आले होते. पण, बाबा सिद्दीकी यांचे असलेले मोठे नाव आणि हत्येसाठी मागितलेल्या मोठ्या रकमेवरून झालेल्या वादानंतर त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.
वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत असून, गुन्हे शाखेने आतापर्यंत १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मोहोळ, साळवे आणि कोहाड यांना गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा फोटो रुपेश वापरत होता. तर एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांची बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी निवड करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांना देण्यात आले होते.
मोहोळ, साळवे आणि कोहाड या तिघांची राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांच्या सोबत ओळख होती. त्यामुळे कानोजिया आणि सप्रे यांनी या तिघांना बाबा सिद्दीकींच्या हत्येचे काम दिले. तिघेही पुण्यातून दोन वेळा डोंबिवलीमध्ये आले होते. कळंबोली आणि अन्य ठिकाणी भेटले. कानोजिया आणि सप्रे यांच्या सोबत मोहोळ, साळवे आणि कोहाड यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घर, कार्यालयांची रेकी केली. माजी राज्यमंत्री सिद्दीकी यांचे मोठे नाव असल्याने तिघांनी अधिक रक्कम मागितली. पुढे, बाबा सिद्दीकी यांची हत्या करणे मोठी बाब असल्याने आणि पैशांवरून झालेल्या वादातून त्यांनी माघार घेतली. नंतर शिवा, कश्यप आणि गुरमेल यांना काम देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले.