मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘अटल सेतू’चे उद्घाटन झाले. अटल सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.डिसेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदींनीच या पुलाची पायाभरणी केली होती. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
मुंबई ते नवी मुंबईतील अंतर २० मिनिटे
अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई यांच्यातील अंतर २० मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या प्रवासाला २ तासाचा अवधी लागतो. अटल सेतू हा १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर बनलेला पूल आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला जोडण्याचे काम करतो. मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासासाठी लागणारा वेळ या अटल सेतूमुळे कमी होणार आहे.
टोल किती? स्पीड मर्यादा किती?
अटल सेतूच्या एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. तर राउंड ट्रिपसाठी ३७५ रुपये मोजावे लागतील. अटल सेतूवरून प्रवास करताना वाहन चालकांना १०० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याची मर्यादा आहे. या सागरी महामार्गावर अवजड वाहने नेण्याची परवानगी नाही. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार आहे. मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल.
१०० वर्षांची खात्री
पुढील १०० वर्ष हा पूल कायम राहणार आहे. अटल सेतूच्या बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पूलावरून दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात वेगवान वारे आणि वादळाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीने लायटिंग पोल डिझाईन करण्यात आले आहे. विद्युत संकटकाळात कुठल्याही संभाव्य नुकसानीपासून वाचण्यासाठी लायटिंग प्रोटेक्शन सिस्टिम लावण्यात आली आहे. अटल सेतू हा मुख्यत: मुंबई – पुणे एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.