मुंबई : राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र, राज्याच्या राजकारणात ‘होल्ड’ असणारा नेता अशी ओळख असणारे, गेली तीन दशके काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अखेर काँग्रेसच्या हाताची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांच्यावर बालपणापासूनच काँग्रेसी विचारांचा प्रभाव आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कॉंग्रेसी विचारांचे संस्कार अशोक चव्हाण यांच्यावर झाले आहेत. पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. विद्यार्थी प्रतिनिधी ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास होता.
अशोक चव्हाण यांच्या नावाला मराठवाड्यात एक वलय आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा दबदबा आहे. आज त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजकारणात उलट-सुलट चर्चा होत आहेत.