मुंबई : जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग अॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महादेव अॅपऐवजी खिलाडी हे बेकायदेशीर बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
आरोपीने खिलाडी बेटिंग अॅप वापरून सरकार आणि इतरांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या साहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते. यामधून त्यांनी करोडोंची कमाई केली आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता.
छत्तीसगडमधील भिलाई हे सौरभ याचे गाव आहे. मित्र रवी उप्पलसोबत सौरभने ‘महादेव ऑनलाईन अॅप’ सुरू केले होते. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आले आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठे नेटवर्क उघड झाले.
नेमके काय आहे प्रकरण?
बहुतेक सट्टेबाजी व्हॉट्सअॅप नंबरवरून केली जाते आणि एजंट, विविध पॅनल बनवून कमिशन तत्त्वावर कॉल सेंटर चालवत आहेत. महादेव बुक अॅपचा मुख्य कार्यालय यूएईमध्ये असून ते मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल चालवतात. केवळ क्रिकेट सट्टेबाजीवरच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर सट्टेबाजीसाठीही या अॅपचा वापर केला जात होता. महादेव बुक अॅपसाठी काम करणारे बहुतेक कर्मचारी छत्तीसगडचे आहेत. जे दुबई आणि यूएईमध्ये स्थायिक झाले आहेत.
महादेव बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ऑगस्टमध्ये अटक केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) चंद्रभूषण वर्मा यांनी सांगितलं होतं की, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मित्रानं हवाला व्यवहाराद्वारे पैसे मिळवले होते. इडीद्वारे दाखल आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.