PM Kisan Samman Nidhi Installment : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून ६ हजार रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा केंद्राचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ताही उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. २०००/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसराआणि तिसरा हप्ता मिळून रू. ४०००/ असा एकुण रू. ६०००/ चा लाभ राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
यवतमाळ येथे कार्यक्रम पार पडणार आहे. या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.