मुंबई: मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसवर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल ४२ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. उसामा आसिम असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्तीकर विभागाला दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मुंबई सेंट्रल टर्मिनसहून सुटणाऱ्या डाऊन १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून हा प्रवासी काही लाखांची रोकड घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी तपासले असता त्यात नोटा आढळल्या. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आल्यानंतर या दोन पोलीस पथकांकडून सर्व प्रवाशांची तपासणी सुरू केली.
त्यावेळी प्रवासी उसामा आसिम याच्या बॅगेत या नोटा सापडल्या. याबाबत तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला पोलिसांनी फलाटावर उतरवून त्याच्या बॅगची दोन सरकारी पंचांसमोर तपासणी केली. त्यावेळी या बॅगेत ४१ लाख ९१ हजार रुपये आढळले.