पुणे, दि. 4 मे 2025: फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ. 12वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक 5 मे 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
निकालासाठी अधिकृत संकेतस्थळे :
विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील –
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
8. https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results
विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिकेची डिजिटल प्रत Digilocker app मध्ये सुद्धा मिळू शकते, तसेच प्रिंटआऊट काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्रक्रिया :
विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत खात्री नसल्यास, गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ही अर्ज प्रक्रिया 6 मे 2025 ते 20 मे 2025 या कालावधीत https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सुरू राहील. अर्जासाठी Debit Card, Credit Card, UPI किंवा Net Banking द्वारे शुल्क भरता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी, उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे आवश्यक असून, छायाप्रती मिळाल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसांच्या आत संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
गुणसुधार संधी:
ज्यांना सर्व विषयांतून उत्तीर्ण होऊन देखील गुणसुधार करायची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जुन-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जुन-जुलै 2026 या तीन संधी उपलब्ध आहेत. हे अर्ज “Class Improvement Scheme” अंतर्गत होतील.
पुरवणी परीक्षेसाठी अर्ज 7 मे पासून :
ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे किंवा खाजगी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसायचे आहे, त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया 7 मे 2025 पासून सुरू होणार आहे. यासाठी स्वतंत्र परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.