मुंबई : सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आह. विज्ञान एक या विषयाचा पेपर नुकताच झाला. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिले आहे. आमदार कपिल पाटील यांची ही मागणी मान्य झाल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांना संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांसाठी अतिरिक्त गुण मिळू शकतील.
दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर १८ मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वांत लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केल्याचे आमदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ असे आहे. मात्र, काही शाळांमध्ये या प्रश्नाचे उत्तर ‘हेलियम’, तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. आमदार पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, या प्रश्नाच्या उत्तराबाबत संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे योग्य ठरेल, अशी चर्चा सुरू आहे. वर्षभर अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकेक गुण महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत बोर्डाने तातडीने निर्णय जाहीर करावा, जेणेकरून विद्यार्थी व पालकांचा तणाव कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.