Relationship Tips: कोणत्याही नात्यात पारदर्शकता आणि विश्वास महत्त्वाचा घटक मानला जातो. विवाहित नातं असो वा प्रेमसंबंध, शंकेची लहानशी छटा देखील मनात अस्वस्थता निर्माण करू शकते. अशा वेळी “तो/ती पूर्वीसारखा नाही का?” किंवा “तो/ती काहीतरी लपवत आहे का?” असे प्रश्न वारंवार मनात येऊ लागतात.

तज्ज्ञांच्या मते, नात्यात फसवणूक वेदनादायक असली तरी काही ठळक लक्षणांवरून वेळेतच परिस्थिती ओळखता येऊ शकते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

फोनपासून अंतर ठेवणे: जर तुमचा जोडीदार अचानक फोन दूर ठेवू लागला, सतत लॉक करू लागला, रात्री उशिरापर्यंत मेसेजेस डिलीट करू लागला, तर हे संशयास्पद लक्षण मानले जाते.

उशिरा घरी परतणे: “ऑफिसचे काम”, “बिझनेस मीटिंग” किंवा “अचानक प्रवास” या कारणांमागे प्रत्येक वेळी खरी कहाणी असतेच असे नाही. वारंवार असे निमित्त सांगणे हा देखील एक इशारा असू शकतो.
स्वभावातील बदल: लहानशा गोष्टींवरून चिडणे, अनावश्यक वाद घालणे किंवा सरळ उत्तरं देण्याचे टाळणे हे भावनिक अंतराचे संकेत मानले जातात.
अचानक प्रेमाचा वर्षाव: गिल्टी फीलिंग लपवण्यासाठी अचानक भेटवस्तू देणे, जास्त प्रशंसा करणे किंवा अति प्रेम दाखवणे हेसुद्धा फसवेगिरीचं एक लक्षण असू शकतं.
एकत्र वेळ न घालवणे: डोळ्यांचा संपर्क टाळणे, स्पर्शापासून दूर राहणे, एकत्र वेळ न घालवणे किंवा रोमँटिक क्षण कमी होणे हे नातं थंडावल्याचे संकेत मानले जातात.
तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणे वारंवार दिसू लागली तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. वेळेत नात्यातील बदल ओळखल्यास भावनिक त्रास टाळून योग्य निर्णय घेता येऊ शकतो.







