पुणे : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला देशभरातून विरोध होत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत संबंध न ठेवण्याची मागणी जोर धरत असताना, या सामन्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Nana Patekar on Asia Cup 2025)

‘माझ्या वैयक्तिक मते, भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये,’ असे नाना पाटेकर म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, “मला असं वाटतं, माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे…त्यामुळे त्यांच्यासोबत का खेळावं असं मला वाटतं.”

नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले की, “सरकारी धोरण काय आहे किंवा त्यांचे नियम काय आहेत ते मला माहीत नाही, पण जर तुम्ही माझे वैयक्तिक मत विचाराल, तर आपण (भारतीय संघाने) खेळू नये.” नाना पाटेकर ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्तीच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







