सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण, तितकेच घोटाळे आणि ऑनलाईन फसवणुकीचा धोकाही वाढत आहे. दररोज आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसोबत ऑनलाईन फसवणूक झाल्याचे ऐकतो-वाचतो. या ऑनलाईन फसवणुकीपासून अगदी सहजपणे दूर राहता येऊ शकते. मात्र, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वात आधी मजबूत पासवर्ड तयार करावा. बहुतेक ऑनलाईन फसवणुकीची सुरुवात पासवर्ड हॅकिंगपासून होते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पासवर्डबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पासवर्डबाबत काही आवश्यक खबरदारी घेतल्यास, ऑनलाईन फसवणुकीचा धोका बराच कमी होतो. तुम्ही प्रत्येक साईटसाठी समान पासवर्ड वापरलात किंवा 123456 किंवा Password सारखा साधा पासवर्ड वापरलात तर तुम्ही सहजपणे ऑनलाईन फसवणुकीचे बळी पडू शकता. ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करणे महत्त्वाचे आहे.
मजबूत पासवर्ड म्हणजे मोठी अक्षरे, लहान अक्षरे, संख्या आणि @, #, $ सारखे विशेष वर्ण वापरणारा पासवर्ड असावा. ऑनलाईन फसवणुकीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फेक लिंक्स आणि ई-मेल पाठवून तुम्हाला अडकवणे. तुम्हाला अनेकदा असे ईमेल किंवा एसएमएस येऊ शकतात की ‘तुम्ही लॉटरी जिंकली’, ‘तुमचे खाते बंद होत आहे’ किंवा ‘येथे क्लिक करा आणि बक्षीस मिळवा’ इत्यादी. असे मेसेज आणि ई-मेल त्वरित हटवावेत.
बऱ्याच वेळा, मोफत वाय-फायचा लाभ घेण्यासाठी, लोक त्यांचे मुख्य डिव्हाईस मॉल, रेल्वे स्टेशन किंवा कॅफेच्या वाय-फायशी जोडतात. या प्रकारचे मोफत वाय-फाय तुमच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचे मुख्य कारण बनू शकते. हॅकर्स या नेटवर्क्सद्वारे तुमचा डेटा चोरू शकतात. म्हणून, सार्वजनिक वाय-फाय वापरताना कधीही बँकिंग, खरेदी किंवा कोणतेही वैयक्तिक व्यवहार करू नका.