सध्या सर्वाधिक मूल्य म्हणून 500 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्यातच गृह मंत्रालयाने 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत इशारा जारी केला होता. सरकारने सीबीआय, सेबी आणि एनआयए सारख्या संस्थांना इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर आता तुम्हाला स्मार्टफोनवरूनच तुमच्याकडे असलेली नोट खरी की खोटी हे समजू शकणार आहे.
तुमच्या फोनवरून खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक करण्यासाठी तुम्ही RBI चे MANI अॅप डाउनलोड करू शकता. हे अॅप विशेषतः चलनी नोटांची ओळख पटविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या अॅपचे पूर्ण नाव ‘मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर’ आहे. तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकता. हे अॅप वापरण्यास खूप सोपे आहे. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला फक्त तुमच्या फोनचा कॅमेरा चालू करायचा आहे आणि तो नोटच्या समोर आणायचा आहे.
यानंतर अॅप आपोआप सांगेल की नोट खरी आहे की नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही. या अॅपची खास गोष्ट म्हणजे नोट फाटलेली किंवा घाणेरडी असली तरीही ती नोट योग्यरित्या ओळखू शकते. तुम्ही काही स्मार्टफोनच्या टॉर्चचा वापर करून नोटची यूव्ही चाचणी देखील करू शकता. भारतीय चलनी नोटांमध्ये फक्त अल्ट्राव्हायोलेट प्रकाशातच दिसणारी शाई वापरली जाते. नोटेवरील क्रमांक आणि सुरक्षा धागे अतिनील प्रकाशात निळ्या किंवा हिरव्या रंगात चमकतात.
फोनच्या फ्लॅश लाईटचा करता येईल वापर
तुम्ही तुमच्या फोनच्या फ्लॅश लाईटला जांभळा किंवा निळा प्लास्टिक लावून यूव्ही लाईट म्हणून वापरू शकता. यानंतर, तुम्ही तो निळा लाईट नोटेवर लावू शकता आणि नोटेवरील अंक किंवा कोणतेही विशेष चिन्ह चमकत आहे की नाही ते पाहू शकता.