नवी दिल्ली: जर तुमचे पालक वृद्ध असतील व त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आता ते तुमच्यासाठी शक्य होईल. वास्तविक, विमा क्षेत्र नियामक (IRDAI) ने आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आणि पॉलिसी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी 65 वर्षांची वयोमर्यादा काढून टाकली आहे. याआधी, ग्राहक केवळ 65 वर्षे वयापर्यंत नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकत होते.
IRDA ने 65 वर्षांची अट काढून टाकली
IRDA ने कमाल वयोमर्यादा काढून टाकून प्रत्येकासाठी आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सोपा केला आहे. आता कोणतीही व्यक्ती आरोग्य विमा योजना सहज खरेदी करू शकणार आहे. अचानक येणाऱ्या आरोग्यावरील खर्च सहज हाताळता येणार आहे. जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन आरोग्य विमा पॉलिसी केवळ 65 वर्षे वयापर्यंत खरेदी केली जाऊ शकते. IRDA चे नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत. त्यानुसार आता आरोग्य विमा कोणत्याही वयात घेता येऊ शकतो.
आजारी असलेल्या लोकांनाही आरोग्य विमा मिळेल
IRDA ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, विमा कंपन्यांना आता अशी आरोग्य विमा उत्पादने बनवावी लागतील, जी सर्व वयोगटातील नागरिकांना लागू होतील.याशिवाय विमा कंपन्यांना ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्व लक्षात घेऊन पुढील उत्पादने आणावी लागणार आहेत. तसेच कंपन्यांना पूर्वीपासून कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनुसार विमा पॉलिसी आणाव्या लागतील. कॅन्सर, हृदयरोग, किडनी या संबंधित समस्या आणि एड्स सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आरोग्य विमा द्यायला कंपन्या नकार देऊ शकणार नाहीत, असे आयआरडीएने स्पष्ट केले आहे. याशिवाय, पॉलिसी घेणाऱ्याला ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी हप्त्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
आयुष उपचारांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नसेल
आयआरडीएच्या नवीन नियमांनुसार, सामान्य आणि आरोग्य विमा सेवा देणाऱ्या कंपन्या आता ट्रॅव्हल पॉलिसी देखील देऊ शकणार आहेत. याबरोबरच आयुष उपचारांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा राहणार नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीमध्ये कोणत्याही कॅपशिवाय विम्याच्या रकमेपर्यंत कव्हरेज उपलब्ध असेल. याशिवाय, एकापेक्षा अधिक दाव्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे