पुणे प्राईम न्यूज डेस्क: गायी, म्हशी आणि शेळीच्या दुधाप्रमाणेच गाढविणीचे दूधही आता लोकप्रिय होत असून त्याला बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या या दुधाची किंमत तब्बल 5 ते 7 हजार रुपये प्रति लिटर आहे. अनेकांच्या दृष्टीने भारवाहू म्हणून ओळखले जाणारे गाढव हे प्राणी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरू लागले आहे. (Benefits of Donky Milk)

सौंदर्य प्रसाधनांत वाढता वापर
एका अहवालानुसार, गाढविणीचे दूध सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्वचा मऊ ठेवणे, नैसर्गिक आर्द्रता वाढवणे आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी हे दूध उपयुक्त ठरते, म्हणूनच अनेक सौंदर्य उत्पादन कंपन्या ते मोठ्या किमतीत विकत घेत आहेत.

बेंगळुरू-हैदराबादमध्ये नवी बाजारपेठ
शहरी भागात, विशेषतः बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या आयटी हबमध्ये गाढविणीच्या दुधाचे उत्पादन वाढत आहे. कच्चे दूध थेट विकल्यासही चांगला नफा मिळतो. मात्र प्रक्रिया केल्यानंतर त्याची किंमत आणखी वाढते.

गाढविणीच्या दुधापासून तयार होणारे चीज प्रति किलो 65,000 रुपये पर्यंत विकले जाते. त्याच्या पावडरची किंमत 1 लाख रुपये प्रति किलो पर्यंत आहे.
आरोग्यदायी गुणधर्म
गाढविणीच्या दुधात प्रथिने आणि अँटीमायक्रोबियल घटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे घटक आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ वाढवून पचन सुधारण्यास मदत करतात. गाय-म्हशीचे दूध न पचणाऱ्या व्यक्तींना गाढविणीचे दूध पर्याय ठरू शकते. तसेच या दुधातील पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्ताभिसरण आणि शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्य, सौंदर्य आणि व्यापारी मूल्य यामुळे गाढविणीच्या दुधाची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे.
हेही वाचा: सावधान! ट्रेंड नव्हे, धोका! तुम्हीही वारंवार नेल आर्ट करताय? मग ही माहिती नक्की वाचा






