पुणे: नेल आर्ट, जेल नेल्स आणि ॲक्रेलिक नेल्सचा ट्रेंड (Nail Art) खूप वाढला आहे. नखे आकर्षक दिसण्यासाठी तरुण-तरुणी वारंवार सलूनमध्ये जात असले तरी, सतत नेल आर्ट करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि नखांसाठी धोकादायक ठरू शकते. या प्रक्रियेत वापरले जाणारे रसायने आणि वारंवार होणाऱ्या उपचारांमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

केमिकल्सचा परिणाम आणि नखांचे नुकसान
नेल पेंट आणि नेल आर्टमध्ये अनेक विषारी रसायने वापरली जातात. फॉर्मल्डिहाइड, टोल्युईनआणि डीबीपी यांसारखे घटक त्वचेद्वारे शरीरात शोषले जाण्याची शक्यता असते. वारंवार नेल पेंट काढण्यासाठी वापरले जाणारे कठोर रिमूव्हर्स नखांना घासल्याने नखे पातळ आणि कमकुवत होतात. यामुळे नखे तुटण्याची समस्या वाढते.
ॲक्रेलिक किंवा जेल नेल्स लावल्यावर नखांच्या खाली ओलावा जमा झाल्यास बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो.
जास्त काळ गडद रंगाचा नेल पेंट वापरल्यास नखे पिवळी पडतात आणि त्यांचा नैसर्गिक रंग बदलतो. अनेक लोकांना या केमिकल्समुळे बोटांवर किंवा नखांभोवती त्वचेची ॲलर्जी किंवा जळजळ होते. ज्यामुळे नंतर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.
जेल नेल्स सुकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यूव्ही लाईटमुळे नखांभोवतीच्या त्वचेला नुकसान पोहोचू शकते आणि दीर्घकाळात त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सतत नेल आर्ट आणि जेल प्रक्रिया करत राहणे हे नखे व त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
(Disclaimer- ही बातमी केवळ जनजागृती आणि माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आली आहे. यात नमूद केलेली माहिती सामान्य गृहितके आणि उपलब्ध अभ्यासावर आधारित आहे. नखांच्या कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञ त्वचा रोग विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. वैद्यकीय सल्ला म्हणून या माहितीचा वापर करू नये.)







