तरुण अथवा तरूणी वयात आल्या की लग्नाचा विचार केला जातो. हे लग्न जुळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. काही तरुण-तरूणी लग्नासाठी चांगलेच इच्छुक असतात. तर काही मुलींना तर लग्न करायची इच्छाच जणू नसते. पण, यामागे काही कारणेही असू शकतात. त्याचीच माहिती आम्ही आज देणार आहोत.
आजची स्त्री ही पूर्वीपेक्षा अधिक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षण झाली आहे. ती तिच्या करिअरमध्ये यशस्वी होत आहे आणि स्वतःचा खर्च उचलत आहे. यामुळे ती तिचे आयुष्य कोणत्याही बंधनाशिवाय स्वतःच्या अटींवर जगू इच्छिते. त्यामुळे लग्न करण्याचा विचार अनेक मुली करत नाहीत. तसेच लग्नानंतर महिलेची ओळख पती आणि मुलांशी जोडली जाते. पण आता महिलांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. विवाहाबाबत अशी भीती असते की त्यांचा वैयक्तिक विकास थांबेल किंवा समाजातील त्यांची ओळख केवळ पत्नी किंवा आई एवढीच मर्यादित राहील. त्यामुळेही अनेक मुली लग्न करण्यास तयार नसतात.
लग्नानंतर घरातील कामांचे ओझे वाढल्यामुळे त्यांना करिअर किंवा छंदांचा त्याग करावा लागेल, अशी चिंता अनेक मुलींना असते. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, हुंडापद्धती यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांमुळेही विवाहाबाबत त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हेदेखील कारण असू शकते.