Maratha Reservation : राजगुरुनगर/आळंदी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्यांदा उपोषण केले. सरकारने टिकणारे आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंत मुदत मागितली आहे. सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, मराठा आरक्षणाबाबत सरकारची कार्यपद्धती पाहून चिंबळी (ता. खेड) येथील सिद्धेश सत्यवान बर्गे (वय २१) या युवकाने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. ४) उघडकीस आली. संबंधित युवकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिद्धेश बर्गे याचे चिंबळी येथे गॅस रिपेअरिंगचे दुकान आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी सिद्धेशने त्याच्या लहान भावाला ‘मी मित्रांसोबत महाबळेश्वरला चाललो आहे,’ असे सांगितले. दरम्यान, रात्री तो घरी न परतल्यामुळे भावाने त्याचा फोन लावला. मात्र, त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे अधिक माहितीसाठी भावाने त्याच्या मित्रांना फोन केला. त्यावेळी तो त्यांच्यासोबत महाबळेश्वरला गेला नसल्याची माहिती मिळाली.
या प्रकारामुळे भावाने गावात शोधाशोध केली असता, सिद्धेशने दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. मी कोणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत नाही. तर सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून आत्महत्या करत आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझा जीव देत आहे. याप्रकरणी कोणालाही दोष देऊ नये. मी मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी मृतदेहाशेजारी लिहिलेली आढळली. माझा सोन्या, आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या, असे लिहून सिद्धेशने खाली सहीदेखील केली आहे. मराठा आरक्षणासाठी सिद्धशने आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.