लहू चव्हाण
(Womens Day 2023) पाचगणी : राज्याच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. महिला सक्षम असल्यातरच देशाची प्रगती झपाट्याने होणार आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन महाबळेश्वर न्यायालयाचे न्यायाधीश आशिष मारगोडे यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये, तालुका विधी सेवा समिती, महाबळेश्वर व महाबळेश्वर तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ( Womens Day )महिलांविषयी कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी न्यायाधीश मारगोडे बोलत होते.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांविषयी कायदेविषयक शिबीराचे आयोजन…
यावेळी महाबळेश्वर तालुका वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रविंद्र भोसले, सहा.सरकारी अभियोक्ता प्रसाद बहुलेकर, ॲड. ए. डी. जगताप,ॲड. हेमंत काळे, ॲड. सुमन जाईकर, ॲड. राजेश जाईकर, ॲड. राजेश शिंदे, ॲड. मनिषा जाईकर, ॲड. लता माजंलकर, मंगल विष्णू ढेबे, कनिष्ठ लिपिक, क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सारिका पुजारी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप लांगी, कल्पना कदम, ग्रामसेवक निनाद पवार, पोलीस नाईक एच. एन. कुभांर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायाधीश मारगोडे पुढे म्हणाले महिलांना कायदेविषयक कुठलीही अडचण असल्यास त्यांनी त्वरित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. त्यांना निकषाआधारे मोफत विधी सेवा पुरविली जाईल. तसेच येत्या १९ मार्च २३ रोजी स्पेशल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर ३० एप्रिल २३ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तडजोडीने आपले प्रकरण मिटवू शकता. लाभ घेऊ शकता असे आवाहन केले.
या शिबिरात आंतरराष्ट्रीय महिला दिन, स्त्री काल आणि आज, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक शोषण प्रतिबंधक कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. विजयकुमार दस्तुरे यांनी केले. सुत्रसंचालन ॲड. कोमल ढेबे यांनी केले तर, आभार ॲड. काजल एल. ढेबे यांनी मानले. सदर कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी, विधी सेवा समितीचे कर्मचारी व क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.