नवी दिल्ली : बलात्कार हा महिलांवरील सर्वात घृणास्पद गुन्हा आहे. मात्र काही महिला त्यांच्या पुरुष जोडीदाराला त्रास देण्यासाठी विनाकारण याचा वापर करतात, असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत नोंदवलेला एक गुन्हा रद्द केला. पूर्वी प्रेमसंबंध असलेल्या महिलेने दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा रद्दबातल करावा, या मागणीसाठी या व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा दाखल केलेला गुन्हा म्हणजे केवळ पश्चातबुद्धी आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मोबाईल रेकॉर्डिंग, व्हॉटस्अॅप चॅट आणि न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेले जबाब हा बलात्कार नसल्याचे स्पष्ट करते. ही महिला पूर्ण भानावर असताना शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त झाली. त्यात लग्नाच्या खोट्या आश्वासनाचा अंतर्भाव नव्हता, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ज्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे, तो महिलांवरील अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे हे खरे.
मात्र काही स्त्रिया आपल्या पुरुष जोडीदाराला अनावश्यक त्रास देण्यासाठी याचा वापर करतात हेही स्पष्ट झाले आहे, असे न्या. चंद्रधारी सिंह यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे. कायदेशीर तरतुदींचा गैरवापर केल्याने निष्पाप व्यक्तींना कसा त्रास होतो, याचे हे आदर्श उदाहरण आहे. या प्रकरणात खटला चालवला असता तरी काही निष्पन्न झाले नसते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या महिलेशी याचिकाकर्त्याचे यापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांचे शारीरिक संबंध परस्पर संमतीने निर्माण झाले. काही मतभेदांमुळे त्यांचा विवाह झाला नाही. त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.