श्रीगोंदा : लोकसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत झालेली संभाजी ब्रिगेड पक्षाची युती विधानसभेला सन्मानजनक जागा न दिल्याने तोडत असल्याचे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता राज्यात संभाजी ब्रिगेड पक्षाकडून स्वतंत्र 25 उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
ज्या विधानसभा क्षेत्रात संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार उभे नाहीत, अशा मतदारसंघामध्ये पक्षाचे तालुकाध्यक्ष यांना सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून इतर पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यात यावा, याबाबतच्या सुचना अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
यामुळे श्रीगोंदा मतदार संघामध्ये काही प्रमुख मुद्द्यावर चर्चा करुन योग्य उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शाम जरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच इतर तालुका स्तरीय निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडला सन्मानजनक जागा देणाऱ्या पक्षाच्या उमेदवारालाच विधानसभेत पाठवणार असल्याचे शाम जरे यांनी सांगितले आहे.
तसेच तालुक्यातील विकासकामे, दूरदृष्टी योजना, सामाजिक सलोखा, प्रशासकीय कामे, तरुणांना रोजगार, छत्रपती संभाजी महाराज स्मारक व शंभुसृष्टी या सर्व महत्त्वाच्या बाबींवर काम करण्याचे उद्दिष्ट घेऊन काम करणार असल्याची भुमिका घेणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची संभाजी ब्रिगेड पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
संभाजी ब्रिगेड पक्षाचा पाठिंबा घेण्यासाठी सर्व प्रमुख उमेदवार यांनी संपर्क केला असून याबाबत उमेदवारांशी चर्चा सुरू असल्याचे देखील शाम जरे सांगितले आहे. या सर्व बाबींवर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 7 तारखेला संभाजी ब्रिगेड याबाबत घेतलेला निर्णय व भूमिका जाहीर करेल, असंही शाम जरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.