पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आता रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे. या प्रकरणात विविध समित्यांकडून रुग्णालयाची चौकशी सुरु आहे. या रुग्णालयावर कारवाई कधी होणार असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.याबाबत आता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तिन्ही विभागाचा अहवाल आल्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तीनही अहवाल आल्यानंतरच दिले जाईल.या मंगेशकर रुग्णालयाची चौकशी तीन विभागाकडून करण्यात येत आहे. हे रुग्णालय धर्मादाय कायद्यातील तरतुदीनुसार सुरु झाले आहे. यामुळे राज्याच्या कायदा विभागाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. दुसरी चौकशी राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तिसरी चौकशी पुण्यातील ससून रुग्णालयाकडून होत आहे. या तिन्ही विभागाचा अहवाल आल्यावर रुग्णालयावर कारवाई केली जाईल. असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे.
तसेच या तिन्ही अहवालातून सत्यता समोर येईल. पुढील दोन ते तीन दिवसात हा अहवाल समोर येईल त्यावर कारवाई संदर्भात सूचना देखील मिळतील,त्यानंतरच कारवाई होईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे.