Wagholi News लोणी काळभोर : वाघोली (ता. हवेली) येथे महापालिका आरोग्य विभागातील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारण येथे कामगार कुठल्याही सुरक्षेविना काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले. (Wagholi News)
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या कामगारांना ना मास्क, ना हँडग्लोज, ना गमबूट दिला गेला. तरीही ते ड्रेनेजच्या साफसफाईचे काम करत आहेत. कचरा संकलन, सफाईचे काम करताना सुरक्षा साधने नसतील तर कामगारांना श्वसनविकार, त्वचाविकार, फुप्फुसाचे विकार होऊ शकतात. पावसाळ्यात कचऱ्यात जीवाणूंचे प्रमाण अधिक असते. नाका-तोंडावाटे ते शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा कामगारांना तात्काळ सुरक्षेचे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे यांनी केली.
साहित्य घेण्यासाठी दिले जातात पैसे
कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे आमची सुद्धा जबाबदारी आहे. पूर्वी स्टोअरकडून सेप्टीचे साहित्य मिळत होते. परंतु, आता ते बंद करण्यात आले आहे. कामगारांना दोन वर्षांतून एकदा साहित्य घेण्यासाठी पगारातच पैसे देण्यात येतात. त्यांनी यांचे साहित्य घेऊन स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
– अनिल ढमाले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक
…अन्यथा महापालिका कार्यालयावर आंदोलन
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कामगार सुरक्षेच्या साधनांअभावी जीव धोक्यात घालून गटार साफ करण्याचे काम करतात. परंतु, त्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कामगारांना तात्काळ साहित्य उपलब्ध करून द्यावे. अन्यथा महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल.
– सागर गोरे, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली