लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी ०४ रोहित्र (डी.पी.) मागील दीड महिन्यापासून जळाले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही रोहित्र दुरुस्त न झाल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
शनिवारपर्यंत (ता. २४) जर रोहित्र बसविले नाही तर उरुळी कांचन (त. हवेली) येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी दिला आहे. याबाबत उरुळी कांचन येथील महावितरण उपविभाग कार्यालयाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय पोफळे यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर सब डिव्हिजन येथील चिंतामणी ०४ डी.पी. रोहित्र मागील दीड महिन्यापासून जळाले आहे. रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही रोहित्र दुरुस्त न झाल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांनी महावितरणला निवेदन दिले होते. परंतु अजूनही आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. नदीलगतचे क्षेत्र असून पाण्याअभावी पिकं जळून चाललेली आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान, आपणास वारंवार विनंती करूनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या रोहित्राबाबत त्वरित निर्णय घेऊन विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात यावी. अन्यथा, भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर शहरच्या वतीने सर्व शेतकऱ्यांसमवेत आपल्या कार्यालयासमोर शनिवारी आमरण उपोषण करण्यात येईल.त्याचबरोबर दिनांक २२ ते २४ या कालावधीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभेचा दौरा आहे. आपल्या बाबत तक्रारीचे पत्र त्यांना देण्यात येणार आहे.
याबाबत उरुळी कांचन येथील महावितरण उपविभाग कार्यालयाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय पोफळे यांना मोबाईल फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद असल्याच्या कारणावरून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.