पुणे : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्ष सोडला आहे. साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. पुणे शहरातील पक्ष चुकीच्या लोकांकडे गेला आहे. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल रात्री मी झोपलो नाही. माझा वाद राज साहेबांशी नाही, मनसेशी नाही, पक्षातील त्या लोकांवर आहे. त्यामुळे आपण बाहेर पडल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले वसंत मोरे?
गेली २५ वर्ष शिवसेनेमध्ये राज ठाकरेंसोबत काम केलं. तसेच त्यांच्यासोबत सोबत करियर केलं आहे. आज मनसेच्या सर्व पदांचा राजनामा दिला आहे. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे म्हणल्यानंतर मनसेमधील पुण्यातील यादी वाढत गेली. मनसेची पुण्यातील परिस्थिती नाजूक आहे. मनसे लोकसभा लढू शकत नाही, माझ्यावर अन्याय झाला, मग माझा कडेलोट झाला…अशी मनातली खदखद वसंत मोरे यांनी बोलून दाखवली.
माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही
तसेच पुढे बोलताना म्हणाले, माझा वाद राज ठाकरे यांच्याशी नाही. मनसेशी नाही. पक्षातील त्या लोकांवर आहे. चुकीच्या लोकांच्या हाती शहर दिले. मला अनेकजण थांबवत होते. माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाया होत होत्या. राज ठाकरे यांच्या मनातलं नाव हटवण्याचे काम कोअर कमिटीने केलं आहे. पक्षाचे वातावरण शहरात चांगले असताना इथले पदाधिकारी निगेटिव्ह आहेत, मी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, आता बाकी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी, असे वसंत मोरे यावेळी बोलताना म्हणाले.
साहेब मुंबईला असतात. पुण्यातील अनेक कार्यक्रमात मला डावलले जातं. मी पक्षात दहशतवादी आहे का? माझ्याबरोबर अनेक जण उभे राहायला घाबरतात. मला ऑफर्स खूप आहेत, कुठे जाणार हे भविष्यात कळेल येणाऱ्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, असही वसंत मोरे यांनी सांगितलं.