उरुळी कांचन : जिल्ह्यात गाजत असलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पहिल्या पोलीस निरीक्षकपदी भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण पोलीस ठाणे कधी सुरू होणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. शंकर पाटील यांची नियुक्ती पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाणे नेमके केव्हा सुरु होईल, याची माहिती अद्याप दिली गेली नाही.
राज्य सरकारने हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली असून, हे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये राहणार आहे. या संदर्भातील आदेश १३ डिसेंबर २०२१ रोजी गृह विभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता.
आमदार अशोक पवार यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून, यामध्ये एक पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, १५ सहाय्यक फौजदार, २० पोलीस हवालदार, पोलीस नाईक २५, तर पोलीस शिपाई ३० पदे भरली जाणार आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी तत्काळ शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
उरूळी कांचन पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा
सोशल मीडियात लोणी काळभोर पोलीस ठाणे पुन्हा ग्रामीण हद्दीत जाणार असा ‘जीआर’ गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उरूळी कांचन पोलीस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर झाला आहे. त्याच्या निर्मितीनंतर ते जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत राहणार आहे. उरूळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. परंतु, उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गेले दोन वर्षे ते सुरू होऊ शकले नाही.
अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांची भोर पोलीस ठाण्यातून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अण्णा पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेतून भोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. तर दिलीप पवार यांची इंदापूर पोलीस ठाण्यातून राजगड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. सूर्यकांत कोकणे यांची नियंत्रण कक्षातून इंदापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.