राहुलकुमार अवचट
यवत: शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकुन नर जातीच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना लडकतवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. यामुळे दौंड तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डकतवाडी गावाच्या बांधावर काटेरी दाट झाडे आणि झुडपे आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांचा सारखा वावर नसतो. परंतु, एका गोपालक राजस्थानी व्यक्तींनी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पत्रकारांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना संपर्क साधुन सदर घटनेची खबर दिली.
या घटनेची माहिती मिळताच यवत येथील वनपाल सचिन पुरी यांनी पडताळणी करुन पुणे सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांना बिबट्या मृत झाल्याची खबर दिली. यानंतर वनसंरक्षक पदाधिकारी व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. राहू येथील सरकारी पशुधन विकास अधिकारी अनिल इंगवले यांनी तपासणी करुन अंदाजे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली असावी. असा अंदाज दर्शविला. पुणे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र दौंड पथकाने परिसरात शेतकऱ्यांना विचारपुस केली असता गाई चारण्यासाठी राजस्थानी व्यक्ती याठिकाणी गेली असता ही बाब निदर्शनास आली.
पुणे विभाग वनसंरक्षण सहाय्यक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे,यांच्या पथकातील वनपाल सचिन पुरी यवत, वनरक्षक नानासाहेब चव्हाण पिंपळगाव, वनरक्षक श्रीमती सुनिता शिरसाट वाळकी, वन मजूर रमेश कोळेकर विलास होले सुरेश पवार नौशाद शेख, या वेळी घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते, सदर मृत पावलेल्या बिबट्याचे शव पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन विल्हेवाट करणार असल्याचे सांगण्यात आले, याबाबतीत पुढील तपास सुरू असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांनी सांगितले,
दरम्यान, उंडवडी लडकतवाडी परिसरात गेली अनेक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता, परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या मेंढ्या जनावरे हल्ला करून जीव मारले आहेत, त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग भयभीत झाला होता, बिबट्या मृत पावल्याचे समजताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. मागणी केल्यानंतर पिंजरा लावला असता तर कदाचित मृत्यू झालेला बिबट्या जिवंत राहिला असता. अशीही प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली.