लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोरसह पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी 21 हजार 500 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.
ही घटना रविवारी (ता. 20) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कल्लापा मंजुळकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास मंजुळकर हे समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. रविवारी मध्यरात्री कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी कॉलेजच्या दरवाजाचे कुलूप उचकटून कॉलेजच्या कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात असलेली रोख रक्कम 7 हजार व शेजारी असलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल मधून 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दरम्यान, प्राचार्य मंजुळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहे.