Tuljapur News : तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीला मोठ्या भक्ती भावाने तिची पूजा केली जाते. तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. भाविक मोठ्या श्रध्देने भाविक सोन्या, चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. 15 वर्षांपासून या मौल्यवान दानाची मोजदादच झाली नव्हती. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी देवीच्या तिजोरीतील मौल्यवान ऐवजाची मोजदाद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Donation of 354 diamonds worth about 40 crores to Tuljabhavani! Counting of gifts given by devotees continues…)
मोजणीचे काम महिनाभर चालणार
15 वर्षानंतर करण्यात येणारे मोजदाद महिनाभर चालणार आहे. 200 किलो सोने आणि 4000 किलो चांदीच्या दागिन्यांची मोजणी करून नंतर त्याची शुद्धता तपासण्यात येणार आहे.
दागिन्यांची मोजणी सुरू असताना शनिवारी एका सिलबंद पाकिटात तब्बल 354 हिरे दान करण्यात आल्याचे दिसून आले. हे हिरे आकाराने छोटे असून त्यांची किंमत 30 ते 40 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.(Tuljapur News ) हे दान कुणी केले याची माहिती मात्र समोर आली नाही. आतापर्यंत तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा तसेच मुंबईतील सिद्धीविनायकाला करण्यात आलेल्या दानाची नोंद आहे. मात्र तुळजाभवानीच्या दानपात्रात एवढे मोठे दान पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून यात नायब तहसीलदार अमित भारती, सहायक धर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी, (Tuljapur News ) जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, देवीचे महंत तुकोजीबुवा महंत, चिलोजीबुवा, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडे यांचा समावेश आहे. सिद्धीविनायक मंदिराचे सुवर्णतज्ज्ञ प्रभाकर काळे यांच्या देखरेखीत ही मोजदाद होणार आहे.
कडेकोट बंदोबस्तात मोजदाद
दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये अत्यंत कडक बंदोबस्तात दागिन्यांचे मोजमाप करण्यात येत आहे. हॉलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून मोजदाद करणार्या कर्मचार्यांना विशेष गणवेष देण्यात आला आहे. (Tuljapur News ) या गणवेषाला एकही खिसा नाही. पहिल्या दिवशी एका पेटीची मोजणी करण्यात आली. यात 720 पाकिटे होती.
रिझर्व्ह बँक देणार वितळवून
तुळजाभवानीच्या दागिन्यांची मोजदाद झाल्यानंतर ते रिझर्व्ह बँकेच्या विशेष समितीकडे पाठवण्यात येणार आहेत. ही समिती शुद्धतेची खातरजमा करून त्यानंतर हा ऐवज वितळवून त्याच्या विटा आणि बिस्किटे बनवून मंदिर संस्थानला परत करणार आहे. (Tuljapur News ) मंदिर संस्थानने बाजारमुल्यानुसार रोकड देण्याची विनंती केल्यास तशीही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.