पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात येत्या सात मे रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी १९ एप्रिल रोजी संपली आहे. त्यानंतर आज अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना निवडणूक चिन्हही देण्यात आलं आहे. यामधील एका निवडणूक चिन्हावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांचा अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाला आक्षेप
बारामती लोकसभेच्या अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाच्या नावाला सुप्रिया सुळेंनी हरकत घेतली आहे. याबाबतचं पत्र सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला मेलवर पाठवलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हा गोंधळ टाळण्यासाठी मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
बारामती लोकसभेतल्या लढती निश्चित झाल्या असून या मतदारसंघात एकूण 38 उमेदवार मैदांत उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील प्रमुख लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे.