ओतूर : पुणे जिल्ह्यातील कल्याण-नगर महामार्गावर अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या हद्दीत इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर दुचाकी व छोटा मालवाहू टेम्पो आणि कारचा तीहेरी अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना सोमवारी (दि. २५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कुनाल नानाभाऊ काळे (वय-१७), रविंद्र सावळेराम भुतांबरे (वय-२२ दोघेही रा. मोरदरा, आबेगव्हाण, ता. जुन्नर, जि. पुणे) हे जागीच ठार झाले आहे. तर श्रीकांत खंडु काळे (वय-१७) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाटा बाजुकडुन कल्याण बाजुकडे आकाश डुंबरे (रा. डुंबरवाडी, ता. जुन्नर) हे सुप्रो छोटा हत्ती गाडी चालवत घेऊन येत होते. त्याच वेळी मयत तरूण ओतूर बाजुकडुन आळेफाटा बाजुकडे जाणारी बजाज प्लसर दुचाकीवर चालला होता. त्यांच्या मागे हुंडाई एक्सेंट कार चालक अभय शेळके (रा. नेरूळ, नवी मुंबई, मुळ रा. कान्दुर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हे कार चालवत निघाले होते.
ओतूर गावाच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर आले असता अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील कुणाल काळे व रविंद्र भुताबरे जागीच ठार झाले. तर श्रीकांत काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.