पुणे : पुणे -नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे नगर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील गर्दीच्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या नगर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे. यामध्ये नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी या भागात प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, अर्धवर्तुळाकार वळण, उजवीकडे वळणात पोलिसांनी बदल केले. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पुढाकारातून नगर रस्त्यावरील येरवडा,विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमितेश कुमार यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच योग्य त्या उपाययोजना वाहतूक शाखेकडून करण्याबाबत सूचना देखील केल्या होत्या.त्यानुसार वाहतूक विभागाने नगर रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना केल्या. येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगरकडे जाणाऱ्या उजवीकडील वळणामुळे मुख्य नगर रस्त्यावर कोंडी होत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करून पुढे अर्धवर्तुळाकार वळण दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली. तर, वडगाव शेरी चौकातून नगरकडे जाताना अग्निबाज प्रवेशद्वारासमोरून उजवीकडे वळण देण्यात आले. त्यामुळे आता वाहतुकीचा वेग वाढला आहे.
दरम्यान येरवडा ते खराडी या भागात केलेल्या या उपाययोजनांनंतर एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतुकीची वर्दळ पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे संबंधित भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.. त्यामुळे नगर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनामुळे मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे.