लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पर्यटकांना मोटोक्रॉस स्पर्धेचा अनुभव घेता येणार आहे. याचे कारण म्हणजे पर्यटननगरी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य राज्य मार्गाची खड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यातच धुक्यांमुळे रस्त्यातील खड्डे न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाचगणी-महाबळेश्वरला आता बाराही महिने पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळते. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून तर हिवाळ्यात गुलाबी थंडीसाठी व पावसाळ्यात मनमुराद पावसात भिजण्यासाठी व घाटातील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण आपला मोर्चा पाचगणी-महाबळेश्वरकडे वळवितात.
दरम्यान, महाबळेश्वरला येण्यासाठी वाई-पाचगणी हा घाट रस्ता आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारे अंदाजे ९० टक्के पर्यटक याच मार्गाने येतात. या रस्त्याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होताना दिसून येते.
नारायण लाॅज ते वेण्णा लेक दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी एवढे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, की या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना आपण चारचाकीत नव्हे तर झिकझॅक व्हीलमध्ये बसल्याचाच भास होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांची हाडे खिळखिळी होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित हे खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.