पुणे : ऑगस्ट महिन्यापासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि व्यवहारावर होणार आहे. त्यामुळे उद्यापासून (ता.१) होणाऱ्या संभाव्य बदलांची आताच माहिती करून घ्या जेणेकरून आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडणार नाही. 1 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम (Rule) बदलणार आहेत. बदलत असलेल्या नियमांमध्ये बँकिंग व्यवस्थेशी संबंधित नियमांचा (Bank Rules) समावेश आहे. एक ऑगस्टपासून कोणत्या पाच गोष्टी बदलणार आहेत.
गॅस सिलिंडर महाग होऊ शकतो
प्रत्येक महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ होऊ शकते.
चेक व्यवहारात बदल
बँक ऑफ बडोदाने १ ऑगस्टपासून चेकमार्फत होणाऱ्या व्यवहारांसाठी नियम बदलले आहेत. ५ लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे चेकच्या व्यवहारांसाठी पॉझिटीव्ह पे सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. चेक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी सन्मान निधीसाठी केवायसी गरजेचं
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचं आहे. असं न केल्यास शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतील १२ वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ जवळील सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्या. किंवा शेतकरी स्वतः संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. १ ऑगस्टपासून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकरी केवायसी करू शकणार नाही.
१८ दिवस बँका राहतील बंद
ऑगस्ट महिन्यात १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. मोहरम, रक्षा बंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी या सर्वांच्या मिळून एकूण १८ दिवस बँक बंद राहणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी जरूर तपासा.
आयटीआर फाईल करणाऱ्यास दंड
३१ जुलैनंतर आयटीआर फाईल करण्याऱ्या करदात्याला दंड भरावा लागणार आहे. जर एखाद्या करदात्याचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जर, एखाद्या करदात्याचं वार्षिक ५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्या करदात्याला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.